खाली  कोकणी जीवनातील काही वैशिष्ठ्यपूर्ण व आनंददायी अनुभवांची यादी दिली आहे. या यादीला चेकलिस्ट मानून आपण यातले काय अनुभवले आहे ते तुम्ही स्वत:च ठरवा.

                                                                 माझे कोकण .................

१) कधी झाडावर चढून आवळे, चिंचा,पेरू जांभळे,ओवळे (बकुळफळे) काढून खाल्ली आहात काय ?

२)गाभुळलेल्या चिंचेच्या स्वर्गीय चवीचा आनंद घेतलात काय ?

३)शाळेत जाता, येताना तोरणे, करवंदे, कणेर, खाल्ली आहेत काय ?

४) विविध चवीचे रायवळ आंबे चाखले आहेत काय ?

५)दगडावर ओली काजू बी घासून, पायाच्या टाचेने आतील काजूगर काढून व तो डोक्यावर पुसून खाल्ला आहे काय ?

६) फणसाच्या झाडाच्या फांदीवर बसून झाडपिक्या फणसातील गरे खाल्लेत काय ?

६)काटेर्‍या अळूच्या झाडावरील अळू काढून ते राखेत पिकायला ठेवून नंतर मित्रांसोबत त्यांचा स्वाद घेतलात काय ?

७)भाजीच्या फडातील काकड्या, चिबूड रात्रीच्या वेळी गुपचूप काढून खाल्ले आहेत काय ?

८) पर्‍यात, ओढ्यात (व्हाळात) मासे पकडून ते कुंभ्याच्या पानात बांधून तयार केलेला व निखार्‍यात भाजलेला 'मोटला'खाल्ला आहे काय ?

९) कांडाळ, इंद, खोईण वापरून नदीतील मासे, किर्व्या (कुर्ल्या) पकडल्या आहेत काय ?

१०) मेणे घालून नदीतील  मासे पकडले आहेत काय ?

११) तुलशीच्या लग्नाच्या दुसर्‍या दिवशी पारंपारिक वाघबारसेच्या कार्यक्रमात भाग घेऊन मित्रांसोबत नदीकाठी जेवला आहात काय ?

१२)करांदे, घोरकंद, शेवरकंद, काटेकणगर  यांचा चुलीत भाजून आस्वाद घेतलात काय ?

१३) डागोळीच्या माशाची बोटी पाणचुलीत भाजून ती भाकरीबरोबर खाल्लीत काय ?

१४) कोंबडा कापल्यानंतर त्याचे काळीज व गांजा, चुलीत भाजून (त्याला लागलेल्या राखेसहीत व कोळशांच्या कणांसह)खाल्लेत काय ?

१५)गावठी पोह्यानीे भरलेल्या बशीत चहा ओतून ते खाल्लेत काय ?

१६)आंब्याच्या झाडावरून वार्‍याने पडणारे आंबे चपळपणे धाऊन जाऊन व जमवून झाडाखालच्या  घरगुटल्यात ठेवलेत काय ?

१६)अनवाणी पायाने माळावर फुललेल्या कोचावरून कौशल्याने धावलात काय ?

१७)चिव्यापासून फिटनळी बनवून तिच्यात चिरफळे  किंवा अळूच्या पानांचा गोळा भरून उडवलेत काय ?

१७)मे महिन्याच्या सुट्टीत नदीवर वायंगणी शेतीसाठी बांधलेल्या घरणात मनसोक्त डुंबलात काय ?

१८)गावात झालेल्या नमनात (खेळे) सुरूवातीपासून बसून असंख्य गुदमरवणार्‍या वासांचा मुकाबला करून रावणाची पाटी नाचेपर्यंत जागलात काय ?

१९)गुराना पाणी पाजायला नेताना कधी रेड्याच्या किंवा म्हैशीच्या पाठीवर बसून अनुभव घेतलात काय ?

२०) खळ्यात नाचणी, हरीक यांच्या मळणीत काम केलेत काय ?

२१)अंगणातील किंवा खळ्यातील माती खणून नंतर ती चोपण्याने चोपलीत काय ?

२२)बिरंबोळे खणून काढून खाल्लेत काय ?

२३) गोमेटे खाल्लेत काय ?

२४)कधी कातभट्टीवर तिखट जेवण जेवलात काय ?

२५) कधी चांदण्यातून बैलगाडीत झोपून प्रवासाचा आनंद घेतलात काय ?

२६)कधी अडीत घातलेले गरमागरम, रसदार रायवळ आंबे चाखलेत काय ?

२७)चुलीत काजू खमंग भाजून त्यांचे गर खाललेत काय ? फणसाच्या अठल्या चुलीत भाजून खाल्ल्यात काय ?

२८)अबयची बी दगडावर घासून तिचा चटका मित्राच्या मांडीला दिलात काय ?

२९)सागाची पाने चिव्याच्या काठीवर लावून त्यांची छत्री बनवलीत काय ?

३०)कधी इरले डोक्यावर घेऊन किंवा घोंगडी डोक्यावर घेऊन जोरदार पावसातून चाललात काय ?

३१)पिरस्यावर वाळत घातलेल्या घोंगडीतून निघणारा वास अनुभवलात काय ?

३२)कधी गावपारधीला गेलात काय ?

३३)बालपणात पँटच्या खिशात पोहे व हाताच्या मनगटावर गूळ चिकटवून गावात फेरफटका मारलात काय ?

३४)माळावर फासक्या लावून कवडे, ल्हावे पकडलेत काय ?

३६) शिमग्यातून पालखी नाचवलीत काय ?

३७)घरातील कोंबडीला घार, कोल्हा मुंगूस पकडून नेत असताना तुम्ही पाठलाग करून तिला सोडवलेत काय ?

प्रश्नपत्रिका मोठी आहे. तरी वरील प्रश्नांपैकी तुमची ५० % उत्तरे जरी "होय" अशी आली तरी तुम्ही कोकणातील खरे जीवन जगलात असे म्हणता येईल !
चला प्रश्नपत्रिका सोडवा ! इथे कॉपी करण्याला संधीच नाही, कारण हे खरे कोकणातील जीवन जगणे आहे.
                                                                  माझे कोकण .................