पाऊस

 पाऊस कधींचा पडतो

 झाडांची हलती पानें; 

हलकेच जाग मज आली 

दुःखाच्या मंद सुरानें. 


डोळ्यांत उतरलें पाणी 

पाण्यावर डोळे फिरती;

 रक्ताचा उडला पारा.... 

या नितळ उतरणीवरती.


 पेटून कशी उजळेना 

ही शुभ्र फुलांची ज्वाला? 

ताऱ्यांच्या प्रहरापाशी

 पाऊस असा कोसळला... 


संदिग्ध घरांच्या ओळी 

आकाश ढवळतो वारा; 

माझ्याच किनाऱ्यावरती 

लाटांचा आज पहारा!